“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:16 PM2024-11-27T17:16:46+5:302024-11-27T17:18:22+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये उत्तम काम केले. महायुती भक्कम करण्याचे काम केले, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता भाजपानेही पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत कौतुक करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. भाजपा नेत्यांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय अंतिम असतो, तसाच तो आम्हालाही अंतिम असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच महायुतीचे नेते म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे, असे समजायचे का, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आमचे केंद्रातील नेते यावर निर्णय घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीही तेच म्हटले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह जो काही निर्णय करतील, त्याच्या मागे एकनाथ शिंदे आणि शिवसेना पूर्णपणे उभी राहील. त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून डबल इंजिनचे सरकार चालवले. महायुतीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक योजना रावबल्या. लोकसभा निवडणुका असतील किंवा आताच्या विधानसभा निवडणुका असतील, एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये उत्तम काम केले. महायुती भक्कम करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. आता जो निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे, तो महायुती आणखी भक्कम करणारा आहे. मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असे बावनकुळे यांनी नमूद केले.