“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:16 IST2024-11-30T16:15:27+5:302024-11-30T16:16:10+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर आहे, अशी टीका महादेव जानकर यांनी केली आहे.

“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यातच राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मोठा दावा केला आहे.
मीडियाशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, महायुतीला एवढे बहुमत आले आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचे? हे त्यांचे ते ठरवतील. महायुतीला एवढे यश मिळाले असताना निर्णय घेत नाहीत त्यावर मी काय बोलणार? भाजपा कोणाला सरप्राइज मुख्यमंत्री करेल? यात मला आजिबात पडायचे नाही. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे, त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर आहे, अशी प्रतिक्रिया जानकर यांनी दिली.
मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते
अनेक ठिकाणी ईव्हीएम घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येते, मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मला सगळे माहिती आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचेच आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही, अशी टीका जानकर यांनी केली.
दरम्यान, ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे काही लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.