Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:27 PM2024-12-04T18:27:09+5:302024-12-04T18:32:17+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ०५ डिसेंबर २०२४ रोजी अतिशय शुभ मुहूर्त असून, सर्वांचे हित लक्षात घेऊन काढण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mahant sudhir das pujari told why was the 5 december 2024 date chosen for the swearing in ceremony very important yog as per shastra | Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर आता ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.

महायुतीकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्यासह ९ ते १० केंद्रीय मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही येणार आहेत. १९ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत. याबरोबरच सर्वधर्मीय गुरुवर्य, साधु-संत-महंत आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीला येणार आहेत. याशिवाय ५ ते १० हजार लाडक्या बहिणी, २ ते अडीच हजार शेतकरी येणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांनी आम्हाला भरीव मदत केली. अशा ५ हजार सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हेही येणार आहेत. वारकरी पंथाचे लोक येणार आहेत. डबेवाले येणार आहेत. ४० ते ५० हजार कार्यकर्ते त्या सभास्थळी दिसतील. याशिवाय २ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची व्यवस्था केली आहे. हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात जिथे एलईडी स्क्रीन आहेत, तिथे सगळ्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे.

शपथविधीला ५ डिसेंबर तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग

शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मुहूर्त ठरवण्यात आले होते. परंतु, ०५ डिसेंबर २०२४ हीच तारीख निश्चित करण्यात आली. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात मार्गशीर्ष मास हा माझा अत्यंत आवडता आहे, असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. तत्त्ववेत्त्यांच्या भूमिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रात बजावत आहेत. ०५ डिसेंबर रोजी गुरुवार, पंचमीचा मुहूर्त आहे. चंद्र मकर राशीत आहे, सूर्य वृश्चिक राशीत आहे, गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. ०५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५ वाजून ५७ मिनिटांनंतर श्रवण नक्षत्र लागत आहे. याचे वृषभ लग्न नावाचे जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा अढळ योग आहे. जसा ध्रुव तारा हा अढळ आहे, तसे पाच वर्षे हे सरकार अढळ राहील, कुठल्या पद्धतीचे वादविवाद किंवा कोणती क्लेषात्मक भूमिका कुठली मांडली जाणार नाही. निर्विघ्नपणे हे सरकार चालेल. असे ०५ वाजून ५७ मिनिटांच्या कुंडलीचे वैशिष्ट्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही सूचना पोहोचवण्यात आली आहे की, तुम्ही ०५ वाजून ५७ मिनिटांनंतर शपथ ग्रहण करावी. तसेच ०६ वाजून ५० मिनिटांपर्यंत हा योग आहे. त्यावेळात हा सर्व विधी व्हावा, अशी धर्मशास्त्रीय रचना सांगते, अशी माहिती नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली. 

पक्ष, सरकार आणि सर्वांचे हित लक्षात घेऊन शुभ मुहूर्त काढला

सर्व एकादशीच्या पूजनाचे एक अनुष्ठान अजित पवारांसाठी नाशिकच्या काळाराम मंदिरात ठेवण्यात आले होते. एकनाथ शिंदे तीनवेळा काळाराम मंदिरात येऊन गेले. सर्वांचे एकंदरीत हित लक्षात घेऊन, सरकारचे हित लक्षात घेऊन, सर्व पक्षांचे हित लक्षात घेऊन हा अत्यंत शुभ मुहूर्त काढलेला आहे, असेही सुधीर दास महंत यांनी सांगितले.

फडणवीस, शिंदे, अजितदादा एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील ही लोकभावना

महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे मोठे बहुमत राजकीय जीवनात कोणत्या पक्षाला मिळालेले नाही. लोकानुकूलता, लोकशाहीत किती मतमतांतरे होऊ शकतात, हे यातून दिसले. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला होणारा हा गेमचेंज कसा घडला, हा एक गुलदस्त्यातील विषय आहे. असे असले तरी लोकांची भावना अशी होती की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुचारु रुपाने एकत्रितपणे महाराष्ट्राला निश्चित पुढे घेऊन जातील. महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य पुन्हा बनवले जाईल, असे मत महंत सुधीर दास पुजारी यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महायुतीच्या शपथविधीचे निमंत्रण आले आहे. आमचे पासेस तयार आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असो, सर्व संत-महंत आखाडे असोत, सर्व प्रमुख मंडळींनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केलेली होती. त्याचा परिणाम आणि त्या सर्वांचे आशीर्वाद या सरकारला लाभलेले आहेत. त्याचे उत्तरदायित्व म्हणून आशीर्वाद देण्याकरिता शपथविधी सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार आहोत, असेही सुधीर दास पुजारी यांनी नमूद केले. ते एबीपीशी बोलत होते.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mahant sudhir das pujari told why was the 5 december 2024 date chosen for the swearing in ceremony very important yog as per shastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.