कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 01:56 PM2024-11-28T13:56:37+5:302024-11-28T13:59:14+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आरक्षणाबाबतीत काम केले. पण, आम्हाला पण लढावे लागले होते. सरकारने आता मस्तीत येऊ नये. आता सुट्टी नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil reaction after eknath shinde took back and devendra fadnavis likely to be a chief minister | कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा

कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला. यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून सर्वांत आघाडीवर आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपाने मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितले की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुम्ही आम्हाला मदत केली, अडीच वर्षे संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय मला महायुतीचा प्रमुख म्हणून मान्य असेल. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील, ज्याला मुख्यमंत्री करतील, त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी कयास आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी थेट शब्दांत भाष्य केले.

नेमके काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय आहे. त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही. आम्ही आमच्याच कामात आहोत. मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे. कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान, मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो. माझ्या समाजाने जे करायचे ते केले आहे. माझ्या समाजाशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही. मराठा समाज ताकदीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला. सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे. मस्तीत येऊ नये. सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आरक्षण बाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil reaction after eknath shinde took back and devendra fadnavis likely to be a chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.