“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 07:51 PM2024-12-04T19:51:46+5:302024-12-04T19:52:00+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil said 100 percent hunger strike will take place for maratha reservation issue and warns mahayuti govt | “मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला.  यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना १०० टक्के उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांशी बेमानी करायची नाही. तुम्हाला आरक्षण द्यावे लागणार आहे. सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखे लफड्यात पडायचे नाही. मराठ्यांपुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरे नाही. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचे नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

आझाद मैदानावर उपोषण होण्याची शक्यता आहे

१०० टक्के उपोषण होणार आहे. पण थोडे पुढे जायचे, असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर उपोषण होण्याची शक्यता आहे. सामूहिक उपोषण होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. कधीच ओबीसी समाजाला विरोधक मानले नाही. सामान्य ओबीसींना एका शब्दाने दुखावले नाही. आम्हाला ओबीसींचा विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही

शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात आमची संस्कृती आहे. आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छा देतो. मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही. आंतरवाली सराटीमध्येच सामूहिक आमरण उपोषण होणार आणि ते खूप भव्य दिव्य होणार. असे आंदोलन कोणी बघितले नसेल असे ते सामूहिक आमरण उपोषण होईल. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, काही केले तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. लढावे लागणार आहे. आमचा चळवळीवर विश्वास आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले, सरकार कुणाचे असले तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil said 100 percent hunger strike will take place for maratha reservation issue and warns mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.