मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 08:01 PM2024-11-26T20:01:01+5:302024-11-26T20:01:29+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उपोषणाच्या तयारीला लागा. आपल्याला आरक्षण मिळवावेच लागेल. मला बघायचेच आहे की, हे सरकार आम्हाला आरक्षण कसे देत नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, निवडणुकीचे, राजकारणाचे खूळ डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल. पण, लेकरांच्या मदतीला येणार नाही. लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्याला नोकरी लावून देणार नाही. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरत्या निघणार आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा, असा नवा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दिला.
किती दिवस उपोषणाला बसणार?
सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करेन. त्या तारखेपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. आपण आपली आरक्षणाची लढाई आता तीव्र करू, उपोषणाची तारीख जाहीर केल्यानंतर आंतरवालीला या. आपण उपोषणाला बसू. सरकार आरक्षण देत नाही तोवर लढाई लढू. आम्ही मरत नाही तोवर उपोषण करणार. मृत्यू येत नाही, तोवर उठायचे नाही असे सर्वांना सांगितले आहे. मला बघायचेच आहे की, हे सरकार आम्हाला आरक्षण कसे देत नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केले असेल, तुम्ही ज्यांना मतदान केलं ते उमेदवार निवडूनही आले असतील. त्या आमदारांशी आरक्षणासाठी भांडा. आपल्याला आरक्षण मिळवावेच लागेल. त्यासाठी सर्व मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक बेमुदत उपोषणाला बसायचे आहे. उपोषणाच्या तयारीला लागा. तुमची शेतातील कामं उरकून घ्या. प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणासाठी या. काही सदस्यांनी घर आणि शेती सांभाळा. दहा ते पंधरा दिवस काम बुडेल, मात्र त्याची तयारी ठेवा. आपण उपोषणाला बसू आणि आरक्षण मिळवू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.