“न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे”; मनोज जरांगेंचे तुळजाभवानी देवीला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 20:24 IST2024-12-01T20:23:25+5:302024-12-01T20:24:12+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: सरकार कुणाचे आले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. सरकार स्थापन झाले की सामूहिक आमरण उपोषण करणार असून, ते मुंबईत होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.

“न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे”; मनोज जरांगेंचे तुळजाभवानी देवीला साकडे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे महायुती सत्ता स्थापनेची जय्यत तयारी करत आहे. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करताना पाहायला मिळत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत साकडे घातले, अशी माहिती मिळाली आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, राजकारण हे आमचे क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असून, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर, काही केले तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. लढावे लागणार आहे. आमचा चळवळीवर विश्वास आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले, सरकार कुणाचे असले तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे
माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे, आशीर्वाद मिळू दे, हेच मागणे तुळजाभवानी मातेकडे मागितले, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.
दरम्यान, आम्ही मैदानात नव्हतो. नाहीतर दणादण पाडले असते. समाज हाच मालक आहे, समाज कोणाच्या दावणीला बांधलेला नाही. मी समाजाचा मुलगा आहे. कोणाच्या दावणीला मी समाज बांधला नाही. समाजाचा वापर होऊ देणार नाही. मराठा समाजाशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही. एखाद्या आमदाने मराठ्यांना साथ नाही, एवढे फक्त बोलून दाखवावे, मग त्याला समाज कसा बाहेरचा रस्ता दाखवतो, हे पाहा, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.