“अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये”; मिटकरींचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 19:41 IST2024-12-01T19:37:15+5:302024-12-01T19:41:22+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

“अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये”; मिटकरींचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत असून, अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी लावून धरली आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एक मोठे विधान केले आहे. याला आता अजित पवार गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. या सर्वांचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. आम्ही फक्त ८१-८५ जागा लढलो. अजित पवार महायुतीत आले नसते, तर त्या जागा आमच्या वाटेला मिळाल्या असत्या, तर आता शिवसेनेच्या ९० ते १०० जागा तुम्हाला दिसल्या असत्या. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले, तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कधी प्रश्न विचारला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांनी अजित पवारांना टार्गेट करू नये. महायुतीत वितुष्ट निर्माण करू नये. गुलाबराव पाटलांनी एक गोष्ट समजून घ्यावी. त्यांचे नाव गुलाबराव आहे. त्यांनी त्याच्या नावासारखे राहावे. हल्ली त्यांचा सुगंध कमी झालेला दिसत आहे. कॅबिनेटमध्ये म्हणजेच राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी त्यांची वर्णी लागत आहे की, नाही याबद्दल जरा शंका आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत असावेत, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला.
श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, या बातम्यांत तथ्य नाही
शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने एकनाथ शिंदेंकडील अनेक नेते नाराज आहे. तर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळणार असेल, तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारले जाईल, असा आग्रह धरण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रिमंडळातील खात्यांवरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, असे दावेही केले जात आहेत. यावर बोलताना, डॉ. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नाही. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या आहेत. गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद त्या पक्षाकडेच राहील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
दरम्यान, महायुती म्हणून आपण सगळे एकत्र निवडणूक लढलेलो आहोत. आताही आपण एकत्र राहिले पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही. तिन्ही पक्षांनी निवडणुकीत खूप मेहनत केली आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांची मेहनत नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मेहनत नाकारत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की या तिन्ही नेत्यांनी, तिन्ही पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. मोठ्या मेहनतीने आपल्याला या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने आपण सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.