“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 03:34 PM2024-11-30T15:34:00+5:302024-11-30T15:34:36+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संसदेत बोलू दिले जात नाही. पैसा, सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणा हाताशी घेतली, ते चित्र महाराष्ट्रात बघायला मिळाले. त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका करत, ९४ वर्षीय कामगार डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. डॉ. आढाव यांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे कामगार चळवळीतील त्यांचे सहकारी चिंतित असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. या बाबा आढाव करत असलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी ईव्हीएमवर मोठे विधान केले.
काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते
ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे काही लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालानंतर जी अस्वस्थता आहे त्यातून बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करतायेत. ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या अशा चर्चा लोकांमध्ये आहे. राज्याच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताशी घेतली गेली ते चित्र महाराष्ट्रात बघायला मिळाले त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली, असे सांगत शरद पवार यांनी निशाणा साधला.
दरम्यान, निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल. लोक जागृत आहेतच, त्यांना उठावासाठी तयार करावे लागेल. बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा आढाव यांच्या उपोषणाने एक प्रकारचा दिलासा सामान्य माणसांना मिळत आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच भूमिका घेणे पुरेसे नाही. जनतेचाही यासाठी उठाव व्हायला हवा. अन्यथा संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होईल. देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत, त्यांना याची काही पडलेली नाही. संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला बोलू देत नाहीत, असा आरोप शरद पवार यांनी केला.