५ डिसेंबरच्या शपथविधीला एकनाथ शिंदे अनुपस्थित असणार का?; शिंदेसेनेतील नेत्यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:42 PM2024-12-03T15:42:04+5:302024-12-03T15:45:51+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांना तब्येत बरी नसल्याने ज्युपिटर रुग्णालयात काही तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरी महायुतीला मुख्यमंत्र्यांची निवड करून नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदे यांना दाखल करण्यात आले होते. काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना घरी सोडण्यात आले.
एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? किती आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध होणार? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीची बैठक होणार नसल्याने अनुत्तरित राहत आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे शक्यतो कोणाच्या भेटी घेत नाहीत. शपथविधीचा दिवस जवळ आला असून, एकनाथ शिंदे शपथविधीला तरी उपस्थित राहणार का, या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.
५ डिसेंबरच्या शपथविधीला एकनाथ शिंदे उपस्थित असणार की नाही?
संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही त्यांना पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांना सलाइन लावले होती. डॉक्टरांनी त्यांना विश्राती घेण्याचा सल्ला दिला आहे. ५ तारखेच्या शपथविधीला जायचे की नाही हे डॉक्टरच ठरवू शकतील. आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे याबाबत निर्णय घेणार आहोत. एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार नाही. सत्ता त्यांना महत्त्वाची नाही. सत्तेसाठी सोंग ढोंग करणे गरजेचे नाही. परिस्थिती जटील आहे. पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. पक्षाचा निर्णय कोणी घेऊ शकणार नाही. आम्ही सर्वजण जाऊ तेव्हा आम्हाला सर्व परिस्थिती कळेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिंदेंची प्रकृती बरी नाही. त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे, कफ झाला आहे. त्यांना थोडा ताप आहे. आम्ही दिल्लीत गेलो होतो तेव्हापासून त्यांच्याबरोबर होतो. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांना दिला आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने त्यांनी काम केले आहे. शेवटी ती एक व्यक्ती आहे. इतका ताण शरीरावर दिल्यानंतर प्रकृती खराब होणे साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.