“राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:53 IST2024-12-04T15:52:47+5:302024-12-04T15:53:41+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मुख्यमंत्री म्हणून नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

“राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभेतील लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. राज्यातील जनता उद्याच्या शपथविधी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन राज्याला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
राज्याच्या विकासाला गती मिळेल
भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेते, पदाधिकारी यांनी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महायुतीकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्यासह ९ ते १० केंद्रीय मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही येणार आहेत. १९ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत. याबरोबरच सर्वधर्मीय गुरुवर्य, साधु-संत-महंत आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीला येणार आहेत. याशिवाय ५ ते १० हजार लाडक्या बहिणी, २ ते अडीच हजार शेतकरी येणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांनी आम्हाला भरीव मदत केली. अशा ५ हजार सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हेही येणार आहेत. वारकरी पंथाचे लोक येणार आहेत. डबेवाले येणार आहेत. ४० ते ५० हजार कार्यकर्ते त्या सभास्थळी दिसतील. याशिवाय २ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची व्यवस्था केली आहे. हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात जिथे एलईडी स्क्रीन आहेत, तिथे सगळ्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे.