राज्यातील कॅबिनेटमध्ये हवे स्थान; रामदास आठवले म्हणाले, “अमित शाहांनी शब्द दिला की...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:03 IST2024-12-04T17:03:08+5:302024-12-04T17:03:36+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते उत्तम काम करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

राज्यातील कॅबिनेटमध्ये हवे स्थान; रामदास आठवले म्हणाले, “अमित शाहांनी शब्द दिला की...”
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. यातच आता रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान हवे असल्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
अमित शाहांनी शब्द दिला की...
मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभेतील लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. राज्यातील जनता उद्याच्या शपथविधी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन राज्याला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.