इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:46 PM2024-10-24T14:46:59+5:302024-10-24T14:50:04+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाशी फिसकटताच संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यामुळे या विधानसभेला राज्यात आणखी काही समीकरणे पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत संभाजी ब्रिगेड या युतीतून बाहेर पडली आहे. यातच आता संभाजी ब्रिगेडचे नेते अंतरवाली सराटीत पोहोचले असून, मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
२०२२ मध्ये संभाजी ब्रिगेडने ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली होती. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रचंड ताकदीने सहकार्य केले. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रचारक, वक्ते फिरले. लोकसभेत महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला, चांगल्या जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत आम्हाला ५-६ जागा देऊ, असे उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले होते. मात्र गेल्या महिनाभर बैठका घेतल्या, आम्हाला ताटकळत ठेवले परंतु कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चांगला समन्वय, चर्चा करून उमेदवार ठरवू
संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीबाबत मनोज आखरे यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजी ब्रिगेड एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा. तसेच ओबीसींची संरक्षण व्हावे. हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटील यांनीही घेतली आहे. समविचारी लोकांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका प्रश्न मार्गी लावायचे असेल तर विधानसभेत आपली माणसे पाहिजेत. आपला झेंडा आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल. मनोज जरांगे पाटील आणि आमच्या समन्वय चांगला आहे. या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत. विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजेत. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही पुढे चर्चा सविस्तर करू. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडे ही उमेदवार येतात. परंतु आम्ही ठरवून उमेदवार देऊ, असे आखरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणार आहे. मराठा समाजाच्या चळवळीत प्रत्येकाचे योगदान आहे. आपला समाज पाठीशी उभा राहिला आहे. हे गोर गरीब जर सत्तेत गेले तर गरिबांचे प्रश्न मिटणार आहेत. श्रीमंतांचे प्रश्न मिटले काय आणि न मिटले काय त्यांना काही फरक पडत नाही. किती मतदारसंघात लढायचे, यावर चर्चा होणार आहे. परंतु, आता आम्ही जाहीर करणार नाही. २९-३० तारखेला मतदारसंघ आणि उमेदवार सांगू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.