“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:00 PM2024-11-18T17:00:45+5:302024-11-18T17:02:09+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने ९० हजार गुजराती दलाल निवडणुकीसाठी आणले असून आता निवडणूक गुजरातींच्या ताब्यात जाणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार संपण्यास अवघे काही तास राहिले आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
जयंत पाटील यांना जर लोकांमध्ये आपण मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचे वाटत असेल तर शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा करावी. भाजपने ९० हजार गुजराती दलाल निवडणुकीसाठी आणले असून आता निवडणूक गुजरातींच्या ताब्यात जाणार आहे. बरे झाले ही गोष्ट पंकजा मुंडे यांनी जाहीर केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एवढे गुन्हे आणि भ्रष्टाचार करुन ठेवला आहे की, या खोट्यानाट्या कामांचा तपास करावा लागणार आहे. त्यामुळे २३ तारखेनंतर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खुलासे देण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील. यावेळेला कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, शहाजी बापूंनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा या वेळेला विधानसभेत निवडून येऊन दाखवावे या वेळेला त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झालेले दिसेल. शहाजी बापू मोठ्या वल्गना करतात, त्यांचे डिपॉझिट राहील की नाही, याबाबत मला शंका आहे. त्यांनी मोठे आव्हान दिले की, राऊतांनी सांगोल्यात येऊन दाखवावे, मी आलो आहे. तुम्ही विधानसभेत पोहोचून दाखवा, हे आव्हान आम्ही देतो. अशी आव्हाने देणारे शिवसेनेने गेल्या ५० वर्षांमध्ये खूप पाहिले, अशी टीका संजय राऊतांनी केली.