“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:36 AM2024-11-07T11:36:53+5:302024-11-07T11:39:37+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जातनिहाय जनगणनेमुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे 'गॅरंटी कार्ड' आघाडीने जाहीर केले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित होते. यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते प्रचारावर भर देताना पाहायला मिळत आहेत.
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार. जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार, अशा पाच मोठ्या घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी सभांवर भर दिल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे
मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. आम्ही आता राज्यांमध्ये दौऱ्यांवर निघालो आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही मागची तीन वर्षे करत आहोत. त्यामुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. चौफेर टीका झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर भाष्य केले नाही.