“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:55 PM2024-11-11T19:55:48+5:302024-11-11T19:55:59+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले?

maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar criticized bjp and pm modi in campaign rally | “सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली असून, राज्यभर दौरे करत प्रचारसभा घेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार शरद पवार व्यक्त करत आहेत. यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

एका प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी १० वर्षांचा हिशोब दिला पाहिजे. गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? महाराष्ट्रामध्ये ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले, असा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफी देणार आहोत. जो नियमित कर्ज भरेल त्यांना ५० हजाराचे अनुदान देणार आहोत. शेती अवजारांवरील GST बंद करणार आहोत. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. नवीन उद्योगधंदे यायला तयार नाहीत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

दरम्यान, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय होते, हे कळत नव्हते. त्यांनी लोकसभेला ४०० पारचा नारा दिला. लोक हुशार होते. लोकांना कळले की देशाची घटना बदलायची आहे म्हणून त्यांना ४०० पार हवे होते. त्यांनी हा डाव हाणून पाडला. गेल्या १० वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. शरद पवारांनी एवढेच केले की, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, अशी टीका शरद पवार यांनी केली.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar criticized bjp and pm modi in campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.