हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:18 PM2024-11-01T15:18:15+5:302024-11-01T15:19:31+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींवर दिलखुलास चर्चा झाली, असे या नेत्याने म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. यातच दिवाळी असल्यामुळे अनेक नेते, पदाधिकारी, मंत्री एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील एका नेत्याने ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो वामन म्हात्रे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वामन म्हात्रे यांनी मिलिंद नार्वेकर यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरल्याचे बोलले जात आहे.
हीच ती वेळ? अचूक टायमिंगची चर्चा
दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने माझे मित्र, मार्गदर्शक शिवसेना सचिव तथा विधानपरिषद सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. नार्वेकर साहेबांसोबत होणाऱ्या इतर भेटीप्रमाणेच आजच्या या भेटीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींवर देखील दिलखुलास चर्चा झाली, अशी पोस्ट वामन म्हात्रे यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.
दरम्यान, या भेटीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आले आहे. मुरबाड मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला मिळावा अशी मागणी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती. महायुतीने भाजपाच्या किसन कथोरे यांनाच पुन्हा संधी दिली. दुसरीकडे सुभाष पवार यांनी मात्र पक्षांतर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली.