ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:54 AM2024-10-24T10:54:32+5:302024-10-24T10:55:22+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अनेक बैठका, चर्चा, दावे-प्रतिदावे, अनेक तास चाललेली खलबते यातून मार्ग काढत अखेर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी फॉर्म्युला जाहीर केला. मविआबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे शरद पवार यांनी या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर समान जागावाटपाचे ८५-८५-८५ असे फॉर्म्युल्याचे 'चित्र' रंगवण्यात आले. महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपली ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली आणि शिवसेनेला मोठेच भगदाड पडले. यानंतर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळाले. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने
आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी २६ मतदारसंघ असे आहेत, ज्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांमध्ये थेट टक्कर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघापासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर यांसह राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने असणार आहेत. विशेष म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. महायुतीच्या जागावाटपात कुडाळची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार असून, वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात थेट लढत असलेले २६ मतदारसंघ कोणते?
क्र. | मतदारसंघाची नावे | शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार | शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार |
१. | कोपरी-पाचपाखाडी | केदार दिघे | एकनाथ शिंदे |
२. | ओवळा माजिवडा | नरेश मणेरा | प्रताप सरनाईक |
३. | मागाठणे | अनंत (बाळा) नर | मनिषा वायकर |
४. | कुर्ला | प्रविणा मोरजकर | मंगेश कुडाळकर |
५. | माहीम | महेश सावंत | सदा सरवणकर |
६. | महाड | स्नेहल जगताप | भरत गोगावले |
७ | राधानगरी | के. पी. पाटील | प्रकाश आबिटकर |
८. | राजापूर | राजन साळवी | किरण सामंत |
९ | सावंतवाडी | राजन तेली | दीपक केसरकर |
१०. | कुडाळ | वैभव नाईक | निलेश राणे |
११. | रत्नागिरी | सुरेंद्रनाथ (बाळ) माने | उदय सामंत |
१२. | दापोली | संजय कदम | योगेश कदम |
१३. | पाटण | हर्षद कदम | शंभूराज देसाई |
१४. | सांगोला | दीपक आबा साळुंखे | शहाजी बापू पाटील |
१५. | परांडा | राहुल ज्ञानेश्वर पाटील | तानाजी सावंत |
१६. | कर्जत | नितीन सावंत | महेंद्र थोरवे |
१७. | मलेगाव बाह्य | अद्वय हिरे | दादा भुसे |
१८. | नांदगाव | गणेश धात्रक | सुहास कांदे |
१९. | वैजापूर | दिनेश परदेशी | रणेश बोरणारे |
२०. | संभाजीनगर पश्चिम | राजू शिंदे | संजय शिरसाठ |
२१. | संभाजीनगर मध्य | किशनचंद तनवाणी | प्रदीप जयस्वाल |
२२. | सिल्लोड | सुरेश बनकर | अब्दुल सत्तार |
२३. | कळमनुरी | डॉ. संतोष टाळफे | संतोष बांगर |
२४. | रामटेक | विशाल बरबटे | आशिष जयस्वाल |
२५. | मेहकर | सिद्धार्थ खरात | संजय पायमुलकर |
२६. | पाचोरा | वैशाली सूर्यवंशी | किशोर धनसिंग पाटील |