“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 07:31 PM2024-11-10T19:31:57+5:302024-11-10T19:32:17+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत असून, लगे रहो मुन्नाभाईतील सर्किटसारखी अवस्था झाली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईमधील सर्किटसारखी त्यांची अवस्था झाली आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात. कदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले, त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. सांगोला येथे उद्धव ठाकरेंची प्रचारसभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले.
गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता टकमक टोक दाखवायचे
महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. त्यांना हेच सांगायचे आहे की, त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक बघितले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, कारण एकाला तिकडे पाठवायचे आहे. मग त्यांनी तिथे झाडे, डोंगर मोजत बसावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान, महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. राज्यातील मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. महायुतीकडून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातील सात बाराही अदानींच्या नावे होऊ शकतो, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.