“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:12 PM2024-11-21T18:12:23+5:302024-11-21T18:14:13+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मध्य प्रदेश आणि हरयाणाचा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये महायुतीला जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ६५.११ टक्के मतदान झाले. अनेक एक्झिट पोल आले असून, बहुतांश जणांनी महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. निकालानंतर काय जुळवाजुळव करता येऊ शकते, यावर चर्चा सुरू झाल्यात आहेत. यातच आता मुख्यंत्रीपदाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक शब्दांत विधान केले आहे. सरकार आम्ही बनवू असेच अनेक एक्झिट पोलमध्ये सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेचा आम्हाला मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिला आहे. महायुतीला बहुमत प्राप्त होईल. विकासासाठी अनेक अपक्ष उमेदवार आम्हाला पाठिंबा देतील, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
अमित शाह यांनी मुख्यमंत्री भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही
अमित शाह यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे कधीच म्हटले नाही, मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असे ते म्हणाले. महिला मतदारांचा वाढलेला टक्का आणि एकूण मतदानात झालेली वाढ याचा फायदा आम्हालाच होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश आणि हरयाणाचा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये महायुतीला जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील. एकनाथ शिंदे यांनी अर्थशास्त्रापेक्षा मनशास्त्राचा जो विचार केला त्याचे कौतुक केले पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.