Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्षप्रवेश नावालाच..खरी कसोटी गावालाच; अंतर्गत राजकारणाची खेळी
By दत्ता यादव | Updated: November 12, 2024 16:30 IST2024-11-12T16:29:39+5:302024-11-12T16:30:59+5:30
दत्ता यादव सातारा : निवडणुकीपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर काही गावांनी पक्ष प्रवेश केले आहेत. मात्र, हे पक्षप्रवेश नावालाच असल्याचे उमेदवार ...

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्षप्रवेश नावालाच..खरी कसोटी गावालाच; अंतर्गत राजकारणाची खेळी
दत्ता यादव
सातारा : निवडणुकीपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर काही गावांनी पक्ष प्रवेश केले आहेत. मात्र, हे पक्षप्रवेश नावालाच असल्याचे उमेदवार व कार्यकर्त्यांना ऐनवेळी समजत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन हादरत आहे. ‘ आम्ही आहोत तुमच्यासोबत,’ असे वरकरणी सांगून मत मात्र पहिल्याच पक्षाला देण्याच्या अंतर्गत हालचाली अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेची खरी कसोटी ग्रामीण भागातील गावागावांत पाहायला मिळणार आहे.
ग्रामीण भागातील गावागावांत राजकारणामुळे दुफळी निर्माण झाली आहे. गावात दोन-दोन पार्ट्या असल्यामुळे साहजिकच याचा परिणाम गावच्या विकासावर होऊ लागला. त्यामुळे काही गावांनी अंतर्गत राजकारणाची खेळी करून विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पक्षात प्रवेश केला. गावासाठी मिळेल ते काम पदरात पाडून घेऊ. मत कोणाला द्यायचं, हे अंतिम वेळी ठरवू, असं अंतर्गत ठरवून पक्ष प्रवेश केलेल्या पक्षाला व त्यांच्या उमेदवाराला गावकऱ्यांनी झुलवत ठेवलं. याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे.
जरी तुम्ही पक्षप्रवेश केला असला तरी आपल्या मूळ पक्षाला विसरू नका, असा अंतर्गत सल्ला राजकीय कार्यकर्त्यांकडून आपल्या हक्काच्या मतदारांना दिला जात आहे. यासाठी वाट्टेल ते करायला राजकीय नेते तयार आहेत. उघड-उघड तुम्ही आमच्यासोबत नाही आला तरी चालेल; पण मत देताना आपल्या पक्षाची जाणीव ठेवा, अशी भावनिक साद घातली जात असून, हक्काच्या मतदारांपर्यंत आतल्या हाताने वेगळीच रसद पुरवली जात आहे.
तर दुसरीकडे पक्ष प्रवेश केलेले मतदार हे आपलेच आहेत. याचा भरोसा नेत्यांनाही राहिला नाही. ऐनवेळी दगाफटका होऊ शकतो, याची जाणीवही नेत्यांना होऊ लागली आहे. तुम्ही कितीही पक्ष बदलायचे आणि गद्दारी करायची; पण आम्ही एका पक्षाची गद्दारी गावच्या विकासाठी केली तर काय बिघडलं, असं खासगीत कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
पण ‘तू’ मूळचा आपल्याच पक्षाचा..
एका राजकीय कार्यकर्त्याला एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला. तो पदाधिकारी म्हणतो. ‘ मित्रा तू त्या पक्षात प्रवेश केला आहेस, तुझी कामेही त्यांच्याकडून होतायत, हे मला माहिती आहे; पण तू मूळचा आपल्या पक्षाचा आहेस. आता खरी गरज इथे तुझी आहे. तू जर सांगितलंस तर मतदान आम्हाला चांगलं होईल. तुझ्या अडचणीसाठी तू पक्षप्रवेश केलास, काही हरकत नाही; पण मत हे आपल्यालाच देशील, याची मला खात्री आहे. असं भावनिक आवाहनही त्या पदाधिकाऱ्यांना केलं.