पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:41 IST2024-11-16T18:40:21+5:302024-11-16T18:41:34+5:30
Kaij Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत विचित्र घटना घडत आहेत. तिथे वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता, म्हणून अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता

पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत विचित्र घटना घडत आहेत. तिथे वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता, म्हणून अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता, तोच उमेदवार आता भाजपाच्या वळचणीला गेल्याने कार्यकर्ते संतापले आहेत. यातून त्यांनी उमेदवाराला काळे फासत चाबकाचे फटके देऊन माफीही मागायला लावल्याचा प्रकार घडला आहे.
बीडमधील केज मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना वंचितने पाठिंबा दिला होता. वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांचा प्रचारही करत होते. परंतू चव्हाण यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि हा धक्का पचवू न शकलेले वंचितचे पदाधिकाऱ्यांना राग अनावर झाला.
भाजपाला पाठिंबा का दिला अशी विचारणा करत जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी चव्हाण यांना काळे फासले व नंतर चाबकाचे फटके लगावले. यानंतर चव्हाण यांचा व्हिडीओ काढत त्यांना माफी देखील मागायला लावली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी या घटनेची चर्चा अख्ख्या बीडमध्ये सुरु आहे.