भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 02:57 PM2024-11-15T14:57:35+5:302024-11-15T14:59:03+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 vinod tawde pankaja munde and chandrashekhar bawankule are also discussed for the post of cm post from bjp | भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा

भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजपाचामुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. 

महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आली तर मुख्यमंत्री कोण असा सवाल सध्या चर्चेत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावे समोर आली आहेत.

भाजपचे राष्ट्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांच्यासह काही नावांचा विचार

भाजपा नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर अन्य काही चेहरेदेखील आहेत असे म्हटले होते. यानंतर आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत, असे म्हटले आहे. भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, तर या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळू शकते, अशी सध्या जोरदार चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व फडणवीस यांच्यासह काही नावांचा विचार करत आहे.  

महायुतीतील तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता महत्त्वाची 

वेगवेगळ्या निकषांवर वेगवेगळी नावे भाजपा नेतृत्वाकडून विचारात घेतली जाऊ शकतात. महायुतीतील तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता आणि मुख्यमंत्रिपदाचा असलेला अनुभव या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू असतील. त्यांनी शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला होता. मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची नावे चर्चेत आहेत. दोघेही शहरी नेते असले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. विनोद तावडेंना संधी मिळाली तर त्यांना विधानसभा वा विधान परिषदेतून आमदार व्हावे लागणार आहे.

मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? 

वंजारी/बहुजन आणि महिला म्हणून पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. लोकसभा निवडणुकीत त्या कमी मतांनी पराभूत झाल्या पण आज पक्षात सक्रिय आहेत. विधान परिषदेच्या सदस्य आहेत. राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे ओबीसी आहेत आणि ओबीसी चेहरा द्यायचा असे ठरले तर त्यांच्या नावावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो असे म्हटले जाते. निकालानंतरच्या समीकरणात फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहतील की दिल्लीत जातील याचा फैसला या निवडणुकीनंतर होणार आहे.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 vinod tawde pankaja munde and chandrashekhar bawankule are also discussed for the post of cm post from bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.