विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:19 PM2024-11-19T23:19:30+5:302024-11-19T23:26:19+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानासाठी केंद्रावर जाताना मतदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यभरात मोठी रणधुमाळी पाहायला मिळाली. आता मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे. मतदारांनी या कालावधीत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.
मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांनी मतदान करताना फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारीचा उपाय म्हणून याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी मतदान करायला जाताना मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे.