अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:53 PM2024-10-26T15:53:57+5:302024-10-26T15:54:32+5:30
Amit Thackeray: माहिममधील उमेदवारी माघे घेणार का, असा सवाल उदय सामंतांना केला असता त्यांनी हा मोठ्या स्तरावरील प्रश्न आहे असे सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला उभे ठाकले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. तर शिंदे गटानेही आधीच सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे. यामुळे अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावे अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आहे. यामुळे सदा सरवणकर माघार घेणार का, या चर्चांना सुरुवात झालेली असतानाच मंत्री उदय सामंत यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे.
माहिममधील उमेदवारी माघे घेणार का, असा सवाल उदय सामंतांना केला असता त्यांनी हा मोठ्या स्तरावरील प्रश्न आहे असे सांगितले. सदा सरवणकर यांनी वाईट काळात साथ दिली ,त्यांना डावलून चालत नाही, असे सामंत म्हणाले. राज ठाकरे यांचे चिरंजीव उभे राहिले आहेत. सदा सरवणकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. आता यावर तीन लोक चर्चा करतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली माहित नाही, असेही सामंत म्हणाले.
आम्हाला महायुतीची सत्ता आणायची आहे, आम्हाला कोणते राजकारण करायचे नाही आहे. ज्यांना जिंकायचं नाही काय त्यांना १७६ पण सारखेच आहेत. स्वतःच्या आघाडीत जे काही सुरू आहे ते पाहायला हवे. हरियाणा निवडणुकीच्या निकालावर काही लोकांनी सकाळी काय बोलावे, अशी स्क्रिप्ट लिहून ठेवली होती, अशी टीका राऊत यांच्यावर सामंत यांनी केली.
एखादे कुटुंब एकत्र येणार नाही असे कोण म्हणाले तर त्यावर बोलणे योग्य नाही. कुटुंब फुटू नये यासाठी राज ठाकरे यांनी दोन वेळा हात पुढे केला होता. मात्र, इतरांनी केला की नाही माहीत नाही. पण राज ठाकरेंनी प्रयत्न केले आहेत, असेही सामंत म्हणाले.