दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 23:47 IST2024-11-03T23:47:03+5:302024-11-03T23:47:59+5:30
रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे.

दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले
राज्यभरात दिवाळी प्रचाराला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. फराळ देत आहेत. अशातच तासगावातून मोठी बातमी येत आहे. रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून तीन हजार रुपये वाटत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले आहे.
रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुकीमध्ये सहानुभूतीच राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. जनता अशा लोकांना धडा शिकवेल. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो लोक पोलीस ठाण्यासमोर येऊन बसणार असल्याचा इशारा संजय काका पाटलांनी दिला आहे.
रोहित पाटील प्रचार करत पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग कार्यकर्ते पैसे वाटत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्याचा दावा संजय काका पाटलांनी केला आहे. तासगाव पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमलेला असून पोलीस प्रक्रिया सुरु असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, रोहित पाटलांकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.