शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:12 PM2024-11-04T16:12:47+5:302024-11-04T16:13:29+5:30
Amit Raj Thackeray vs Eknath Shinde: शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे.
गेल्या काही दिवसांच्या वाक्युद्धानंतर माहीमचा लढा आता स्पष्ट झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे. अमित ठाकरेंसाठी माघार न घेतल्याने सरवणकर व शिंदे सेनेविरोधात मनसैनिकांचा राग असणार आहे. हा राग फक्त माहीमच नाही तर मुंबईतील शिंदे गटाविरोधात असलेल्या १२ मतदारसंघांमध्ये निघण्याची शक्यता आहे.
मनसेने एकनाथ शिंदेची शिवसेना जिथे जिथे उमेदवार लढवतेय त्यापैकी १२ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. शिंदे सेना मुंबईत १६ जागा लढवत आहे. यापैकी १२ जागांवर आता मनसैनिकांचा रोष पत्करावा लागणार आहे. उर्वरित ४ जागांवरही मनसे शिंदे सेनेला मदत करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सस्पेन्स होता. आमदार सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती.
दरम्यान, आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि काही कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी गेले होते, यावेळी ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट दिली नाही. दरम्यान, या भेटीवर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, आम्ही राज ठाकरे यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली नाही. तुम्ही निवडणूक लढणार असाल तर लढा, असं राज ठाकरेंनी सांगितल्याचे सरवणकर म्हणाले. यामुळे आता मी निवडणूक लढणार आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले.
माहीमच्या जागेवरील हा वाद आता १२ ते १६ मतदारसंघांत दिसणार आहे. हे मतदारसंघ कोणते आहेत.
वरळी - मिलिंद देवरा (शिंदे गट) - संदीप देशपांडे (मनसे)
माहीम- सदा सरवणकर (शिंदे गट) - अमित ठाकरे (मनसे)
धारावी – राजेश खंदारे (शिंदे गट) – मनसेने उमेदवार दिला नाही.
कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिंदे गट) - प्रदीप वाघमारे (मनसे).
चांदिवली - दिलीप लांडे (शिंदे गट) - महेंद्र भानुशाली (मनसे).
चेंबूर - तुकाराम काठे (शिंदे गट) - मोली थोरवे (मनसे)
दिंडोशी - संजय निरुपम (शिवसेना) - भास्कर परब (मनसे)
जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर (शिवसेना) – भालचंद्र अंबुरे (मनसे)
भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिंदे गट) - शिरीष सावंत (मनसे).
विक्रोळी- सुवर्णा करंजे (शिंदे गट)- विश्वजीत डोलम (मनसे).
मानखुर्द शिवाजी नगर- सुरेश पाटील (शिवसेना)- जगदीश खांडेकर (मनसे).
मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिवसेना)- नयन कदम (मनसे)