झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:20 PM2024-11-20T14:20:02+5:302024-11-20T14:20:31+5:30
Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०) मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.
देशभरात दोन राज्यांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांचे आज मतदान होत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत झारखंड महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत झारखंडमध्ये ४७.९२ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले असून ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यानंतर गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ३८.५६ टक्के असे मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामतीत अनुक्रमे ३५.६३ आणि ३३.७८ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्वती मतदारसंघात २७.१९, पिंपरीत २१.३४, शिवाजीनगर २३.४६, वडगाव शेरी २६.६८ टक्के मतदान झाले आहे. पुणेकरांसमोर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०) मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.