Maharashtra Bandh : "ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:30 AM2021-10-11T10:30:24+5:302021-10-11T10:31:19+5:30
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदवरून भाजपचा टोला. लखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद.
लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh) हाक देण्यात आली. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून टोला लगावला आहे.
"ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे. आज फक्त अधिकृतपणे करतायत एवढेच," असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे. आज फक्त अधिकृतपणे करतायत एवढेच.#NoMaharashtraBand
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 11, 2021
शेलार यांचाही टोला
"बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवलx त्या तथाकथित 'बंदसम्राटांचा' पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केलं, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी श्रमिकांना देशोधडीला लावलं," असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला. "एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच, हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा 'धंदा' गोळा होतो त्यावरच 'चंदा'!," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
सरकारचं हीन राजकारण - उपाध्ये
"लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला आहे.