Maharashtra Bandh : आंदोलनादरम्यान हिंसा किंवा जाळपोळ करु नका, शरद पवार यांचे मराठा समाजाला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 09:39 PM2018-07-24T21:39:59+5:302018-07-24T22:16:28+5:30
सरकारमधील मंत्र्यांनी बेताल वक्तव्य टाळावीत
मुंबई - मराठा समाजाचे आंदोलन पेटण्यास महाराष्ट्रातील सरकार जबाबदार आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर कठोर टीकास्त्र सोडले आहे. मराठा आंदोलकांच्या असंतोषाला आणि चिघळलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
मराठा समाजाने आंदोलनादरम्यान जाळपोळ किंवा हिंसा करू नये असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. उद्या मुंबईसह उपनगरात मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारला आहे. सरकारमधील मंत्र्यांनी बेताल वक्तव्य टाळावीत तसेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी शरद पवार यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.
मराठा समाजाने शांततामय मार्गाने मोर्चे काढल्यानंतर सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती, असे सांगत हे सरकार आरक्षणविरोधी असल्याने केवळ मराठाच नाही, तर मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला .
सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप त्यांना आरक्षण मिळालेलं नाही. त्याच विषयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावा. सत्तेवर येण्याआधी फडणवीस सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मोठमोठ्या बाता मारत होते. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळालं नाही. फडणवीस सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.