Maharashtra Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, चांदणी चौकात दगडफेकीमुळे लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:43 PM2018-08-09T16:43:43+5:302018-08-09T16:44:39+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. या भागात अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
गुरुवारी मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
सकाळपासून शहरात बंद शांततेत सुरु असताना अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे चांदणी चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण होऊन पोलिसांवर दगडफेक झाली.यात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. ही परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान शहरातून चांदणी चौकाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. कोथरूडच्या मोरे विद्यालय भागातही काही वेळापूर्वी टायर जाळण्यात आले असून बाकी सर्व भागात परिस्थिती नियंत्रणात आहे.