सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’

By admin | Published: June 3, 2017 05:46 AM2017-06-03T05:46:33+5:302017-06-03T05:46:33+5:30

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुण्यात दूध आणि भाजीपाल्यांची चांगलीच टंचाई निर्माण झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी

'Maharashtra Bandh' on Monday | सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’

सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुण्यात दूध आणि भाजीपाल्यांची चांगलीच टंचाई निर्माण झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी किसान क्रांतीच्या कोअर कमिटी सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला पाचारण केले आहे. मात्र, राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांनी सरकारविरोधात बंदचा आसूड उगारला असून, ५ जून रोजी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी कालपासून संपावर गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन न देता, केवळ कृषी पतपुरवठ्याची आकडेमोड जाहीर केल्याने संपकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. आंदोलनाचे लोण राज्यभर पसरल्याने भाजीबाजार उठला असून, दूध संकलन केंद्रांना टाळे लागले आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये २० हजार टन मालाची आवक झाली आहे.
मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्तात गुजरातहून दूध मागविण्यात आले आहे. शिवाय, महानंदमध्ये दूध भूकटीपासून दूध तयार करण्यात येत आहे.
या संपाला राजकीय पक्षांचे पाठबळ मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे आणि शिवसेनाही संपात उतरल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत सरकारकडून मिळत असले तरी, सरकारचा हा कुटील डाव असून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केली आहे.
तर शेतकऱ्यांची फसवणूक करून हे सरकार सत्तेवर आल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातील जवान आणि शेतकरी मरत असताना भाजपवाले खुशाल आहेत, असा टोलाही त्यांनी लागवला.

आंदोलनाची रूपरेषा


५ तारखेपर्यंत संपाबाबत निर्णय न झाल्यास, मुंबई वगळता राज्यभरात
५ जूनला कडकडीत बंद, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्यास, ६ तारखेला राज्यातील सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले जाईल. त्यानंतरही निर्णय न झाल्यास ७ तारखेला राजकीय पुढाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा कार्यक्रम समन्वय समितीने जाहीर केला आहे.

मग शाळेत जा!- राज ठाकरे

शेतकरी संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या आश्वासनाचाही त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेतला. -वृत्त/७

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले
शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे.

संप चिघळू नये, म्हणून मध्यस्थी करण्याची तयारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दर्शविली आहे. मात्र, किसान क्रांतीने अण्णांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. अण्णांच्या माध्यमातून सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.

मुंबईत आले गुजरातचे दूध : राज्यामध्ये शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याने दुधाची टंचाई निर्माण झाली असताना, गुजरातहून वसई-वर्सोवा मार्गे अमूल कंपनीचे दूध बाजारात दाखल होत आहे. वसई व इतर मार्गावरून येणाऱ्या पट्ट्यात शेतकऱ्यांचा संप नसून, खासगी टँकरद्वारे दोन दिवसांत अमूल कंपनीने १६ लाख लीटर दुधाची विक्र ी मुंबईमध्ये केली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शहरातील दूधविक्रेत्यांनी दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना या संपाचा फटका बसत आहे.

मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा!
मुंबई भाजी मार्केटमध्ये १४७ वाहनांची आवक झाली. कांद्याची एकही गाडी आली नाही. आवक कमी झाल्याने दर प्रचंड वाढले आहेत. कोथिंबिरीची छोटी जुडी ५० व मोठी १०० रुपयांना विकली जात होती. इतर भाजीपाल्याचे दरही दुप्पट झाले असून, संप असाच राहिला, तर सर्वच भाज्यांचे दर शंभरी पार करण्याची शक्यता आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो ५ ते १२ रुपयांवरून १४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. भेंडी १० ते १८ रुपयांवरून १४ ते ३२ रुपये, कोबी ८ ते १० रुपयांवरून २० ते २५ रुपये किलोने विकली जात होती. 

Web Title: 'Maharashtra Bandh' on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.