'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:03 PM2021-10-11T13:03:38+5:302021-10-11T13:03:45+5:30
Lakhimpur Kheri Violence: 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही.'
कोल्हापूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारा(Lakhimpur Kheri Violence)विरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh)पुकारला आहे. या बंदवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्या दिवशी गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, असं पाटील म्हणाले.
माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही. लखीमपूर घटनेत जीप घुसली आणि चार जणांना चिरडलं गेले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या घटनेनंतर शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं. पण, त्या दिवशी जर गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा असता, तर त्यालाही मारलं असतं,'अस पाटील म्हणाले.
महाराष्ट्र बंदची गरज काय ?
पाटील पुढे म्हणाले, लखीमपूरच्या घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक झाली, त्याची चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार या प्रकरणाचा काय निवाडा लागायचा तो लागेल. पण, यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती? व्यापाऱ्यांनी केवळ शिवसेनेच्या भीतीने दुकानं बंद ठेवली आहेत, यावरुन हा बंद सपशेल फसल्याचे सिद्ध झालंय. राज्यातील जनतेला हे नाटक कळतंय, भाजप या महाराष्ट्र बंदचा निषेध करतं, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.