महाराष्ट्र बँकेकडून अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By admin | Published: March 13, 2017 03:59 AM2017-03-13T03:59:44+5:302017-03-13T03:59:44+5:30
यूपीआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खात्यातून परस्पर पैसे पळवत सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र बँकेला तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला.
औरंगाबाद : यूपीआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खात्यातून परस्पर पैसे पळवत सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र बँकेला तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला. याप्रकरणी बँकेने ८४ ग्राहकांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणूक आणि सायबर क्राईम कलमानुसार गुन्हा नोंदविला.
यूपीआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकाच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी एक लाखापर्यंतची रक्कम दुसऱ्या खात्यात आॅनलाईन वर्ग करू शकतो.
ही बाब सायबर गुन्हेगारांनी हेरली आणि त्यांनी बँक ग्राहकांचा मोबाईल अथवा सीमकार्ड मिळवून यूपीआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेत आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्र बँकेच्या विविध शाखांमधून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ कोटी ७ लाख रुपये आॅनलाइन लुटले.
ही बाब समोर येताच बँकांनी संबंधित ग्राहकांना नोटिसा पाठवून तात्काळ आॅनलाइन लुटलेली रक्कम बँकेत भरण्याचे कळविले; परंतु ग्राहकच त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार करीत असल्याने शेवटी महाराष्ट्र बँकेचे विभागीय उपमहाव्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपी किरण अण्णासाहेब गव्हाड, सुरेश रामचंद्र्र भोसलेसह शहरातील विविध बँक शाखांतील ८४ खातेदारांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला.
एकाला अटक
यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेचा ग्राहक असलेल्या मित्राचे सीमकार्ड वापरून बँकेला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या राजेश बिस्वास (२८, ह.मु. वाळूज एमआयडीसी, मूळ रा. चंद्रपूर) याला सायबर क्राईम सेलच्या माध्यमातून एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)