घरांच्या विक्रीतून महाराष्ट्र मालामाल! मुद्रांक शुल्कातून राज्याची १८६ अब्ज रुपयांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:36 AM2022-11-23T11:36:56+5:302022-11-23T11:40:39+5:30
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक मालामाल झाले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नाेंदणीपाेटी मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राला १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला.
नवी दिल्ली : घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्यामुळे देशभरात मुद्रांक व नोंदणी शुल्कात ३५ टक्के वाढ झाली असून, महाराष्ट्रासह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेश मालामाल झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशभरात मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी तब्बल ९४८.४७ अब्ज रुपयांची कमाई झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा ७०१.२० अब्ज रुपये एवढा होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्राची सर्वाधिक कमाई झाली आहे. राज्याला तब्बल १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला आहे.
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक मालामाल झाले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नाेंदणीपाेटी मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राला १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला.
घट फक्त बिहारमध्ये
बिहारच्या महसुलात ७३ टक्के घसरण झाली आहे. घसरण झालेले ते एकमेव राज्य ठरले आहे. बिहारचा महसूल २३ अब्ज रुपयांनी घसरून ६.२१ अब्ज रुपये झाला.
‘पुढील वर्षी बसू शकताे फटका’ -
- ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे मुख्य अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्राने मागील १८ ते २४ महिन्यांत उत्तम कामगिरी केली आहे.
- येणाऱ्या तिमाहीत या क्षेत्रास जागतिक मंदी, व्याजदर वाढ आदी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
४०% वाढ ११ राज्यांत -
११ राज्यांच्या महसुलात ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय आणि मिझोराम ही ती राज्ये होत. मिझोरामच्या महसुलात सर्वाधिक १०४% वाढ झाली आहे.