दुबईमध्ये महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे; दुबईस्थित मराठी संघटनांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:02 PM2024-08-08T19:02:26+5:302024-08-08T19:03:29+5:30
छत्रपती मराठा साम्राज्य संघटना व दुबईस्थित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट
छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) संघटनेचे संचालक मंडळ व दुबईस्थित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ३ ऑगस्ट रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. भेटीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील व परदेशातील मराठी समुदायासाठी संघटनने सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. हे सर्व सण व उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे महाराष्ट्र भवन / महाराष्ट्र सदन निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या कार्याची माहिती घेतली आणि विशेष कौतुक केले. तसेच, महाराष्ट्र भवनाच्या सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊ असे, आश्वासन दिले. अभिजीत इगावे आणि अभिजीत देशमुख यांनी या विषयात पुढाकार घेतला. यावेळी त्यांच्यासह अमोल दुबे पाटील, मुकुंदराज पाटील, आदित्य जगदाळे, सारंग पाटील, राहुल पवार, अतुल जाधव आणि हितेश पाटील हेदेखील उपस्थित होते. याच विषयावर यापैकी काही जण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाही भेटले. त्यांनीही या प्रकरणात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, आखाती देशांत सुमारे ५ लाख मराठी अनिवासी भारतीय स्थायिक आहेत, जे विविध सामाजिक संस्थांद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत. आज दुबई हे फक्त आखाती देशातील एक महत्त्वाचे केंद्रच नाही तर जगभरातील मराठी लोकांसाठी एक वैश्विक केंद्र बनले आहे. दुबईमध्ये सर्व मराठी समुदाय हा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी जोडलेला असून महाराष्ट्रातील सर्व सण व उत्सव येथील मराठी मंडळी अगदी जल्लोषात साजरे करतात.
दुबई येथे सध्या तीन ते साडेतीन लाख मराठी बांधव नोकरी व उद्योगधंद्यानिमित्त वास्तव्यास आहेत. लाखो मराठी पर्यटक दरवर्षी दुबईला भेट देतात. हजारो मराठी बांधव विविध सणवारानिमित्त विविध संस्थेमार्फत एकत्र येत असतात व महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा, आषाढी एकादशी, महाराष्ट्र दिन व इतर सर्व सण दुबईमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. हे सर्व सण-उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे. हे महाराष्ट्र भवन मराठी अनिवासी भारतीय आणि इतर देशांतून येणाऱ्या पर्यटकांना विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी कार्यरत राहिल. या महाराष्ट्र भवनात किमान १५०० लोकांची क्षमता असलेला सांस्कृतिक हॉल असावा. महाराष्ट्र सरकारने या भवनाचे अधिकृत व्यवस्थापन करावे आणि महाराष्ट्राच्या परंपरा व किर्तीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे, अशी विनंती CMS संघटनेच्या दुबईमधील पदाधिकाऱ्यांनी केली.
या उपक्रमासाठी दुबई मराठी मित्रमंडळ, स्वामिनी ढोलताशा पथक, संस्कृती मंडळ, शिंपी समाज दुबई, गणेश भजनी मंडळ व वारकरी संप्रदाय वर्ग शारजा, शिवाजीकाका ग्रुप दुबई, आखाती मराठी बांधव, जिजाऊ ब्रिगेड संघटना, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच दुबई व सत्यशोधक दुबई व इतर सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी पाठिंबा दिला असून हे भवन उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वोपतरी सहकार्य करण्याचेही सर्व संघटनांना कळविले आहे.
यावेळी छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) संघटनेने त्यांच्या ऑफिससाठी महाराष्ट्रामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात यावी जिथे रोजगार, शैक्षणिक संदर्भात विविध योजना व ट्रेनिंग समाजातील वेगवेगळ्या स्तरातील घटकांना स्थान देता येईल, तसेच ग्रंथालय व वसतिगृहाची निर्मिती करता येईल असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला.