'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बक्षिसाची संपूर्ण रक्कम केली सरकारला दान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:06 PM2023-04-16T14:06:14+5:302023-04-16T14:06:51+5:30

२५ लाख रूपयांचे बक्षिस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची कार्यक्रमातच केली घोषणा

Maharashtra Bhushan Award Winner Appasaheb Dharmadhikari donated full amount of his price money rs 25 Lakhs to Maharashtra Government | 'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बक्षिसाची संपूर्ण रक्कम केली सरकारला दान

'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बक्षिसाची संपूर्ण रक्कम केली सरकारला दान

googlenewsNext

Maharashtra Bhushan Award, Appasaheb Dharmadhikari: नवी मुंबईत ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. तसेच, या कार्यक्रमासाठी अनेक श्री सदस्यांनी उपस्थिती लावली. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. आपले वडिल नानासाहेब यांच्या प्रमाणेच नि:स्वार्थ सेवेचा वसा जपण्याच्या कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, याच नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण त्यांनी तेथेच कार्यक्रमात दाखवून दिले. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची संपूर्ण रक्कम त्यांनी दान केली.

२५ लाखांचे बक्षिस दान

महाराष्ट्र सरकारच्या वतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रायगडमधील रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आज अमित शाहांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी पुरस्काराची २५ लाखांचे मानधन हे त्यांनी भर कार्यक्रमातच दान केल्याची घोषणा केली. त्यांना मिळालेली बक्षिसाची पूर्ण रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली.

दरम्यान, दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचे कार्य त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे सुरू आहे. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेत. याशिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा वाटा आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे, यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे.

वडील नानासाहेब धर्माधिकारी हे देखील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित!

२००८ मध्ये राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१० मध्ये नोंदही करण्यात आली होती.  

Web Title: Maharashtra Bhushan Award Winner Appasaheb Dharmadhikari donated full amount of his price money rs 25 Lakhs to Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.