माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:56 PM2024-10-07T18:56:42+5:302024-10-07T18:56:55+5:30

भीती, दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

Maharashtra big success in breaking the supply chain of Maoists Chief Minister Shinde claim | माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

CM Eknath Shinde ( Marathi News ) : "राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. त्यामुळे या भागात भीती आणि दहशतीवर मात केली," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी  नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे.  सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या २०१३ मध्ये ५५० होती, ती २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गेल्या सहा वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले आणि ७० जणांनी आत्मसमर्पण केले,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने आमच्या सरकारच्या कार्यकाळात मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही.  माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. हे आमच्या विकास धोरणाचे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईत केंद्र सरकार आणि शेजारील राज्य छत्तीसगड यांच्या धोरणांना महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही देतानाच स्थानिकांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार योजना राबवून डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांचा सामना करून या भागातील भीती, दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

गर्देवाडासारख्या संवेदनशील भागात प्रथमच एसटी बस सेवा सुरू झाली.  काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्हा ७१.८८ मतदान टक्केवारीसह संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल होता. माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि पोस्टर्सद्वारे लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. पण ते नाकारून लोकांनी बॅनर आणि पोस्टर्स फाडून ते जाळले आणि लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त केल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Maharashtra big success in breaking the supply chain of Maoists Chief Minister Shinde claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.