राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:00 AM2021-08-30T11:00:00+5:302021-08-30T11:02:28+5:30
Maharashtra Temple Reopen: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत.
Maharashtra Temple Reopen: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे. यात चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून आजच मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे काही कार्यकर्ते कसबा गणेश मंदिरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचं भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.
पंढरपुरात नामदेव पायरीजवळ आंदोलन
पंढरपुरात देखील भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सोलापूर : पंढरपुरात भाजपचे आंदोलन; विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न pic.twitter.com/ItZG9Rf3xt
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021
मुख्यमंत्र्यांनी धर्मयुद्धासाठी तयार रहावं
नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली आज गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महतांच्या उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव होईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.
नागपूर आणि औरंगाबादमध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ठिकठिकाणी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शनं केली जात आहेत.