अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका
By यदू जोशी | Published: November 28, 2018 01:17 PM2018-11-28T13:17:38+5:302018-11-28T13:23:00+5:30
भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली.
मुंबई : भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली.
रावसाहेब दानवे यांनी 40 गुंडांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याचा आरोप अनिल गोटे यांनी विधानसभेत केला. भाजपामध्ये प्रवेश दिलेल्या या गुंडांपैकी 28 जणांवर 302, 307, 352 असे विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. भाजपामध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो, असा दावा करण्यात येतो. मात्र, एका वाल्याचा वाल्मिकी होईल, सर्वच गुन्हेगार कसे काय वाल्मिकी होतील, असा सवाल करत अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.
याचबरोबर, माझ्यासह माझ्या पत्नीची बदनामी करण्यात येत आहे. ही बदनामी करणारे कोणी बाहेरचे नसून पक्षातीलच लोक करत आहेत. मात्र, हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं, हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं, अशा शब्दांत अनिट गोटेंनी भाजपालाच टोला लगावला.
दरम्यान, विधानसभेत अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.