महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटरवरून चक्क स्वत:चेच सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 13:21 IST2017-12-03T13:16:57+5:302017-12-03T13:21:10+5:30
सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची सोशल मीडिया सेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. विरोधी पक्ष, विरोधी नेते यांच्यावर आरोपांची राळ उडवणे, तिखट भाषेत टीका करणे, विरोधकांना ट्रोल करणे असले प्रकार या सोशल मीडिया सेलकडून करण्यात येत असतात. मात्र रविवारी हे सोशल मीडियास्त्र भाजपावर उलटले.

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटरवरून चक्क स्वत:चेच सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई - सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची सोशल मीडिया सेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. विरोधी पक्ष, विरोधी नेते यांच्यावर आरोपांची राळ उडवणे, तिखट भाषेत टीका करणे, विरोधकांना ट्रोल करणे असले प्रकार या सोशल मीडिया सेलकडून करण्यात येत असतात. मात्र रविवारी हे सोशल मीडियास्त्र भाजपावर उलटले. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करताना झालेल्या घोडचुकीमुळे महाराष्ट्र भाजपाची सोशल मीडिया सेल चेष्टेचा विषय ठरली.
त्याचे झाले असे की नेहमी विरोधकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपाच्या सोशल मीडिया सेलने खुद्द महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपा सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यावरून सरकार आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरणारे ट्विट महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले.
एकीकडे राज्यात दोन लाख सरकारी कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सरकार कर्मचाऱ्यांमध्ये 30 टक्के कपात करण्याच्या विचारात आहे. हा प्रकार मेक इन महाराष्ट्र नव्हे तर फूल इन महाराष्ट्र आहे. अशी टीका ट्विटमधून करण्यात आली होती.
खुद्द भाजपाच्याच ट्विटर अकाऊंटवर स्वत:च्या सरकारवर टीका करणारे ट्विट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. विशेष बाब म्हणजे या ट्विटमध्ये काही काँग्रेसी नेत्यांनाही टॅग करण्यात आले होते. अखेर चूक लक्षात येतात. हे ट्विट काढून टाकण्यात आले. मात्र तोपर्यंत हे ट्विट बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. त्यामुळे भाजपाची सोशल मीडिया सेल नेटीझन्समध्ये चेष्टेचा विषय ठरली.