Maharashtra Budget 2018: राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटींची कर्जमाफी- अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 03:09 PM2018-03-09T15:09:31+5:302018-03-09T15:30:54+5:30
2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा केला. यासाठी तब्बल 13 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याशिवाय, गेल्या काही काळापासून कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूदी असणार याबद्दल अटकळ बांधली जात होती. त्यानुसार आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसोबत सिंचन आणि जलसंपदा विभागासाठी अनेक तरतूदी दिसून आल्या.
आतापर्यंत राज्यातील 35.68 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून त्यासाठी 13 हजार 782 कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. तर आगामी वर्षात जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या महत्त्वपूर्ण तरतुदी पुढीलप्रमाणे:
* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.
* सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
* सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद
* वनशेतीस प्राधान्य देण्यासाठी 15 कोटींची तरतूद
* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार
* कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद
* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार
* मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.
* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद
* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद
* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.
* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी
* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. त्यासाठी १६० कोटी एवढा निधी.