Maharashtra Budget 2018 : महाराष्ट्राचा प्रगतशील अर्थंसकल्प – विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 07:54 PM2018-03-09T19:54:28+5:302018-03-09T19:54:28+5:30
मुंबई - महाराष्ट्राला विकासाकडे आणि अर्थिक प्रगतीकडे नेणारा हा अर्थंसकल्प आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या व विमुक्त जाती, महिला आदी समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. दिव्यांगाचाही विशेष विचार करण्यात आला असून, त्यांच्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे.
शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत वाढविल्याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आल्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि मराठी नाट्य संमेलनाकरीता अनुदानात दुप्पटीने वाढ करुन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राचा यथोचित सन्मान राखण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संरक्षित किल्यांच्या थ्रीडी मॅपींगसाठी केलेल्या तरतूदीमुळे गडकिल्यांच्या संवर्धनाला अधिक मदत होणार आहे. ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग.दि.माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्षाकरीता त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगावकर, नाट्य कलाकार मच्छिंद्र कांबळी, कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकाकरिता तरतूद करुन त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्यात आला आहे.