महाराष्ट्र बजेट 2019: मंगल देशा... स्मारकांच्याही देशा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:07 AM2019-06-19T03:07:00+5:302019-06-19T06:49:16+5:30
समाजपुरुषांच्या नावे स्मारकांची उभारणी, ऐतिहासिक वास्तू विकासासाठी कोट्यवधी रुपये
मुंबई : ‘भारत जमीन का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष है, हम जीयेंगे तो इसके लिये, मरेंगे तो इसके लिये... असे सांगत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात समाजपुरुषांच्या नावे स्मारकांची उभारणी, ऐतिहासिक वास्तू विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले.
महाराजा प्रतिष्ठान आंबेगाव (जि.पुणे) येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी ५० कोटींची तरतूद आहे. किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांची योजना असून त्यावर आतापर्यंत ५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात व दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत उभारण्यात येईल. स्वातंत्र्य युद्धात पराक्रम गाजवणारे क्रांतिकारक खाजाजी नाईक यांचे स्मारक धरणगाव, जि. जळगाव, ज्येष्ठ रंगकर्मी दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, शिवरामराजे भोसले यांचे स्मारक सावंतवाडी येथे, वीर भागोजी नाईक यांचे स्मारक नांदुरशिंगोटे जि. नाशिक येथे, वीर नाग्या कातकरी यांचे स्मारक चिरनेर, जि. रायगड येथे, वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक घोट जि. गडचिरोली येथे, जंगल सत्याग्रहातील शंभर जनजाती वीरांचे जनकापूर जि. नाशिक, रावलापाणी स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक नंदुरबारात उभारण्यात येईल. सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पानशेत; जि. पुणे येथील स्मारकाची दुरूस्ती करण्याचा येईल. या सर्वांसाठी ५० कोटी रुपये ठेवले आहेत.
तीर्थक्षेत्रांसाठी १५० कोटी रुपये
तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात श्रीक्षेत्र कपिलधारा बीड, श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी (वाशिम), कुणकेश्वर (सिंधुदुर्ग) व आंगणेवाडी (सिंधुदुर्ग), सद्गुरु सखाराम महाराज संस्थान (जळगाव), निवृत्तीनाथ मठ (नाशिक) या तीर्थक्षेत्रातील यात्रेकरुंच्या सोयीकरीता पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत.