महाराष्ट्र बजेट 2020: बळीराजाचं आयुष्य 'उजळणार'; कर्जमुक्तीसोबतच पाच ठळक घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:23 PM2020-03-06T13:23:08+5:302020-03-06T13:25:21+5:30
Maharashtra Budget 2020 शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या पाच महत्त्वाच्या घोषणा
मुंबई: राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मागील सरकारची कर्जमारी दीड वर्ष चालली. आम्ही मात्र ती प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करू, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी समोर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १ लाख या प्रमाणे ५ लाख सौर कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा दिवसा करण्यावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
भूजल पातळी वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना' राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऊसासह इतर पिकांच्या ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येईल, असंदेखील त्यांनी सांगितलं. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणादेखील अजित पवारांनी केली.