Maharashtra Budget 2022: फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:08 PM2022-03-11T17:08:00+5:302022-03-11T17:46:53+5:30

Maharashtra Budget 2022: या बजेटचं मी स्वागत करते, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार; भाजप आमदारांकडून सरकारचं कौतुक

Maharashtra Budget 2022 bjp mla manda mhatre appreciates budget after 100 crore declared for maharashtra bhavan | Maharashtra Budget 2022: फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या

Maharashtra Budget 2022: फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या

Next

मुंबई: ठाकरे सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलं आहे, अशा तिखट शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर तोफ डागली. सरकारनं राज्यातील गोर गरीब, दीन-दलित, शेतकरी, कामगार, मराठा, ओबीसी, आदिवासी अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामं केल्याची टीका त्यांनी केली. मात्र फडणवीस यांच्याच पक्षाच्या आमदार असलेल्या मंदा म्हात्रेंनी अर्थसंकल्पाचं स्वागत करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेबद्दल भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारचे आभार मानले.

'नवी मुंबईकरांकडून मी ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचं स्वागत करते. महाराष्ट्र भवनाचा विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होता. वेळोवेळी मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला. आज अर्थमंत्र्यांनी त्यासाठी १०० कोटींची तरतूद जाहीर केली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानते,' असं म्हात्रे म्हणाल्या.

फडणवीसांची कडक शब्दांत टीका
राज्य सरकारचं बजेट कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटला कोणत्याही प्रकारची दिशा नाही. मागील बजेटमधील आणि चालू असलेल्या कामाच्याच घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या आहेत. आमच्याच योजनांचं श्रेय  घेण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत आहे. समृद्ध महामार्गासह बुलेट ट्रेनला विरोध करणारं सरकार आता त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करत आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यातही हे सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Web Title: Maharashtra Budget 2022 bjp mla manda mhatre appreciates budget after 100 crore declared for maharashtra bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.