Maharashtra Budget 2023 : आशा, अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:46 PM2023-03-09T14:46:06+5:302023-03-09T14:47:02+5:30
Maharashtra Budget 2023 Live Updates : राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे.
राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
आज अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका तर साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे ३ हजार ५०० रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे ४ हजार ७०० रुपये एवढे आहे. या मानधनात १५०० रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे.
तसेच अंगणवाडी सेविकांचं मानधन हे ८ हजार ३२५ वरून १० हजार रुपये एवढे करण्यात येत आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात येत आहे. तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे ४४२५ वरून ५५०० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबरोबरच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच अर्थसंकल्पामधून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी इतरही काही घोषणा केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.