Maharashtra Budget 2023, Devendra Fadnavis | साईभक्तांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पातून शिर्डीला मिळालं मोठं 'गिफ्ट', विमानतळांसाठी तगडी तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:35 PM2023-03-09T15:35:36+5:302023-03-09T15:36:33+5:30
देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच मांडला अर्थसंकल्प
Maharashtra Budget 2023, Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. आजचा अर्थसंकल्प हा पंचामृत म्हणजेच पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर मांडण्यात आला. १. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, २. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, ३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, ४. रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि ५. पर्यावरणपूरक विकास अशा पाच प्रमुख मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने एक विशेष निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे, राज्यातील साईभक्तांसाठी राज्य सरकारने एक विशेष भेट दिली आहे.
साईभक्तांची शिर्डी येथे कायमच मोठ्या प्रमाणावर हजेरी असते. बाराच्या बारा महिने भाविक साईंच्या दरबारात आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये नेहमीच भाविकांची गर्दी असते. या साऱ्या गोष्टींचा विचार करता यंदाच्या अर्थसंकल्पात शिर्डीसाठी एक विशेष घोषणा करण्यात आली. भाविकांना प्रवास करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी अर्थसंकल्प सादरीकरण्याच्या वेळी दिला. तसेच, या टर्मिनलच्या उभारणीसाठी तब्बल ५२७ कोटींची तरतूद असल्याचे सांगितले.
याशिवाय, विमानतळांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्याचा विचार व्यक्त केला आहे. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार असल्याची घोषणाही करण्यात आली. तसेच, नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद आणि बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.