Maharashtra Budget 2023 : ‘लेक लाडकी’ मोठी होईपर्यंत लखपती होणार; महिलांसाठी फडणवीसांनी योजनांचा अक्षरश: पाऊस पाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:39 PM2023-03-09T15:39:28+5:302023-03-09T15:40:16+5:30
मुलिंच्या सक्षमिकरणासाठी 'लेक लाडकी योजना'... महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट... नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे... अन् बरंच काही...!
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. खरे तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून हा देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच अर्थसंकल्प असून याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी महिलांसाठीमहिलांसाठी योजनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. याच वेळी त्यांनी मुलींसाठीही ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा केली आहे.
मुलिंच्या सक्षमिकरणासाठी 'लेक लाडकी योजना' -
यावेळी मुलींसाठी योजनेची घोषणा करताना फडणवीस यांनी संत तुकाराम महाराजांना कोट करत "लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची..." असे म्हणत, ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार... -
- पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळेल
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 75,000 रुपये मिळतील.
अर्थात मुलगी मोठी होईपर्यंत जवळपास लखपती होईल.
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट -
- राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकिटदरात महिलांना सरसकट 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर विकसित करण्यात येईल
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर विकसित करण्यात येईल.
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. यात बचत गटांना जागा देण्यात येईल.
- राज्यात जवळपास ८१ हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गट प्रवर्तकांच्या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपयांची वाढ.
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- महिला सुरक्षित, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण तयार करण्यात येणार
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे -
- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिली जाईल
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार