अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:57 PM2023-03-09T15:57:38+5:302023-03-09T15:58:43+5:30
Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासह शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये घसघशीत वाढ करण्यासारख्या घोषणांचा समावेश आहे.
आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासह विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचीही घोषणा केली आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या १ हजार रुयपांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून ती ५००० हजार रुपये करण्यात आली आहे. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या १ हजार ५०० रुपयांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून ती ७ हजार ५०० रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पामधून करण्यात आली आहे.
त्याबरोबरच शिक्षणसेवकांच्या मानधनाबाबतही अर्थसंकल्पामधून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये १० हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांच्या मानधनात सहा हजार रुपयांवरून १६ हजार रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ८ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनाच ९ हजार रुपयांवरून २० हजार रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे.
त्याबरोबरच राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकाम करण्याची घोषणा अर्थसंकल्पातीन करण्यात आली आहे. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे ही महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.